भिवंडी : (प्रतिनिधी )तालुक्यातील भिवंडी पारोळ रोड हा वसईकडे जाणारा मुख्य रस्ता असून या रस्त्यालगत वसलेली पाडे व गावे आदिवासी समाज बहुल आहेत. या परिसरात राहणाऱ्या गावातील ग्रामस्थांसाठी चिबीपाडा येथे ठाणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्याचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करावे आणि रूग्णांना सशक्त उपचारासाठी तज्ञ डॉक्टर व नर्स उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) पक्षाचे भिवंडी तालुका युवा अध्यक्ष अजिंक्य गायकवाड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी लेखी निवेदन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
भिवंडी तालुक्यातील जुनांदुरखी, टेंभवली, फिरंगपाडा, पिंपळशेत भुईशेत, आमराई, लाखिवली, नांदा, कुहे, धामणे, गाना, खडकी, पालीवली, ही गावे आणि या गावांना जोडणारी अनेक पाडे अस्तित्वात आहेत. या गावांची एकत्रित लोकसंख्या अंदाजे ५० हजारापेक्षा जास्त आहेत. यामध्ये मजूर कामगार, शेतकरी वर्ग, वीटभट्टी कामगार व महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एवढ्या मोठ्या विभागात पाया येथील गावात जिल्हा परिषदेचे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात पुरेसे डॉक्टर्स, नर्स, औषधे, व इतर अनुषंगित सुविधा नसल्यामुळे या गावातील रूग्ण महिला व ग्रामस्थ नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांना भिवंडी शहरातील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाचा उपचारासाठी आधार घ्यावा लागतो.
चिंबी पाडा ते भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय हे गावापासून दुर असल्याने तेथे पोहोचण्यासाठी ग्रामस्थ नागरिकांना तासभर लागतो जीवघेणा प्रवास करत रुग्णालयात पोहचल्यानंतर तेथेही अनेक वेळा योग्य उपचार मिळत नाही, विशेष करून गरोदर महिलांना. त्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी रुग्णांना ठाणे-मुंबईचा रस्ता धरावा लागतो. त्यामुळे चिंबी पाडा येथे असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करून गोरगरीब आदिवासीं समाज बांधव आणि कामगार वर्गास योग्य औषध उपचाराचा वैद्यकीय उपचारांचा लाभ द्यावा अशी मागणी अजिंक्य गायकवाड यांनी राज्य शासनाकडे
केली आहे.