क्राईम
Trending

देशात १५० आमदार, खासदारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे.

दिल्ली, दि. २२-कोलकात्यात ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर देशभरात इतर ठिकाणीही अनेक बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या. यावरून राजकारणही तापले असून राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करत आहेत.
दरम्यान, नेत्यांबाबतही धक्कादायक अशी माहिती समोर येते. देशातील दीडशे आमदार, खासदारांवर महिलांवर अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल असून यात १६ जणांवर तर बलात्काराचे आरोप आहेत, यात पश्चिम बंगालमधील सर्वाधिक खासदार, आमदार आहेत. तर पक्षनिहाय आकडेवारीत भाजपच्या नेत्यांवर जास्त गुन्हे आहेत.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालात २०१९ ते २०२४ या कालावधीत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून ही माहिती समोर आली. विद्यमान खासदार आणि आमदारांच्या ४ हजार ८०९ प्रतिज्ञापत्रांपैकी ४ हजार ६९३ प्रतिज्ञापत्रे तपासण्यात आली. १३५ आमदारांबद्दल धक्कादायक खुलासा झाला आहे, विद्यमान खासदार आणि आमदारांमध्ये असे १६ नेते आहेत ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत. त्याच्यांवर कलम ३७६ अंतर्गत बलात्काराशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. अशा गुन्ह्यांत किमान १० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
राजकीय पक्षनिहाय अत्याचाराचे गुन्हे असणाऱ्या नेत्यांची आकडेवारी पाहिली तर त्यात भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. भाजपचे ५४ नेते, तर काँग्रेसच्या २३ नेत्यांवर अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. यात टीडीपीचे १७, आपचे १३, तृणमूल काँग्रेसचे १०, अपक्ष ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस, रासप, प्रहार जनशक्ती पार्टी यांच्या प्रत्येकी एका नेत्याचा समावेश आहे. राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना, विशेषतः महिलांवर अत्याचार, बलात्कारांसारखे गुन्हा असलेल्यांना तिकिट देऊ नये. पोलिसांकडून तपास व्हावा अशी मागणी असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉम्स्रने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!