भिवंडी प्रतिनिधी:
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे!’ खरेच, निसर्गाचा अविभाज्य घटक असलेली ही झाडे आपले सगेसोयरेच असतात; कारण, झाडांमुळे पाऊस वेळेवर व मुबलक प्रमाणात पडतो. चांगला पाऊस पडला, की शेतीभाती पिकते. परिणामी, पृथ्वीवरील सर्व सजीवांना अन्न, पाणी उपलब्ध होते. झाडांची मुळे जमिनीची धूप होऊ देत नाहीत. ती माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता (भूजल पातळी) वाढते. जलचक्र सुरळीत चालते. झुडूप, वेली, रोपटी, वृक्ष इत्यादी झाडांच्या विविध प्रकारांमुळे निसर्गात जैवविविधता जपली जाते. हिरव्यागार झाडांमुळे जणू सृष्टीने हिरवा शालू नेसला आहे असे वाटते. वातावरण प्रफुल्लित होते. एकंदरीत पर्यावरणाचा समतोल राखला जातो यासाठी बांधिलकी सामाजिक संस्थेच्या यावर्षी ५० हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासन दरवर्षी झाडे लावण्याचे आवाहन करत असते. परंतु झाडे लावण्याची इच्छा असतानाही स्वतःकडे जागा नाही आणि वेळ नाही. यामुळे झाडे लावणे शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन बांधिलकी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्रजी सोनवणे यांनी प्रत्येकी एक झाड संस्थेस दान करून निसर्गाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले आहे.
त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन विविध सामाजिक संघटना, पत्रकार संघटना यांनी बांधिलकी या सामाजिक संस्थेस हजारो झाडे दान केली आहेत.
ही दान केलेली सर्व झाडे बांधिलकी सामाजिक संस्थेच्या वतीने दहा एकर जागेमध्ये लावली जाणार आहेत. व त्याचे संवर्धन केले जाणार आहे. ही झाडे दान करणाऱ्या संस्थेत किंवा व्यक्तीस बांधिलकी सामाजिक संस्थेच्या वतीने आकर्षक प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र सोनवणे यांनी आमचे भिवंडी वृत्तनामाचे प्रतिनिधीशी बोलताना दिली.