बदलापूर घटना प्रकरणी भिवंडीत व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघातर्फे वामन म्हात्रेंचा निषेध
भिवंडी – दि.२३ (प्रतिनिधी)- बदलापूर येथील बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा पाठपुरावा करणाऱ्या महिला पत्रकार यांना अश्लील शब्दात समज देऊन अपमानास्पद वागणूक देणारे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा भिवंडी तालुका, व्हॉईस ऑफ मीडिया यांच्या वतीने निषेध करण्यात आला. या वर्तनाबद्दल वामन म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन व्हाईस ऑफ मीडिया भिवंडी, भिवंडी तालुका यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
बदलापूर येथील शाळेत दोन बालिकांवर घडलेल्या अत्याचाराच्या प्रकरणात पत्रकार या नात्याने येथील अंबरनाथ येथील स्थानिक पत्रकार मोहिनी जाधव या पाठपुरावा करीत होत्या त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते व अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी लज्जा उत्पन्न होईल अशा अश्लील भाषेत पत्रकार जाधव यांच्याशी संभाषण केले, या वर्तनाबद्दल म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी व वक्तव्याचा निषेध करण्यासाठी व्हाईस ऑफ मीडिया, भिवंडी तालुका यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार चंद्रकांत रजपूत यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष फारूक मेमन, भिवंडी प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष चव्हाण, भिवंडी तालुका अध्यक्ष अशोक पाटोळे, कार्याध्यक्ष महेंद्र सोनावणे, भिवंडी महानगर अध्यक्ष भगवान विश्वकर्मा, इरफान पटेल तसेच व्हाईस ऑफ मीडियाचे ठाणे जिल्हा प्रवक्ते रंगनाथ तांगडी आदी उपस्थित होते.