(महेंद्र सोनावणे)
येत्या चार महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत असल्याचे संकेत असून, या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व राजकीय पक्ष,संस्था,संघटना यांनी उमेदवारी कुणाला द्यायची या विषयी चाचपणी सुरू केली असतांनाच महाराष्ट्रात सामाजिक कामात अग्रेसर असणारी जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेने कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक लढवण्याचे रणशिंग फुंकले आहे.जिजाऊ संघटनेमुळे कल्याण पश्चिम येथील राजकीय गणिते बिघडणार असुन महायुती, महाविकास आघाडीचा ताप वाढणार असे मत कल्याण पश्चिम येथील राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांचे आहे.
महिनाभरापुर्वीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मतदारांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पैकी भिवंडी विधानसभा मतदारसंघ पुर्व, पश्चिम, ग्रामीण असे तीन मतदार संघ भिवंडीत आहेत.उर्वरीत कल्याण पश्चिम, मुरबाड आणि शहापूर मतदार संघ आहेत. भिवंडी ग्रामीण आणि शहापूर हे विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहेत. भिवंडी पूर्व आणि पश्चिम हे मतदार संघ मुस्लिम बहुल मतदार संघ आहेत.त्यामुळे या दोन्ही मतदार संघात मुस्लिम उमेदवारच निवडून येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करीत आहेत तर, मुरबाड विधानसभा मतदारसंघात आमदार किसन कथोरे यांनी विकास कामांचा डोंगर उभा केल्याने कथोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकून येणे हे तितकेसे सोपे नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा सुरक्षित मतदार संघ आहे म्हणून अपक्ष, संस्था , संघटना, नव्याने निर्माण झालेले राजकीय पक्ष यांनी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आपले पाय रोवायला सुरूवात केली आहे.
भिवंडी लोकसभा पार पडलेल्या निवडणुकीत जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी निवडणूक लढवून जवळपास अडीच लाख मतदान मिळवलेले आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातून निलेश सांबरे यांना सर्वाधिक मतदान झालेले आहे. कल्याण पश्चिम या शहरी भागात भिवंडी, शहापूर, मुरबाड या तालुक्यांच्या ग्रामीण भागातील लोक नोकरी निमित्त मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत या संधीचा फायदा मिळविण्यासाठी जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था ही ,कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा करून आपले नशिब आजमणार आहे. जिजाऊ संस्थेचे शैक्षणिक, आरोग्य, महिला सक्षमीकरण या केलेल्या कामांचा मतदारांमध्ये चांगलाच बोलबाला आहे.त्यामुळे या मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीला जिजाऊच्या उमेदवाराला रोखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे हे मंत्री राहिलेले व गेली दहा वर्षे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे कपिल पाटील यांचा या मतदारसंघात जनसंपर्क व विकास कामाची कमतरता यामुळे कपिल पाटील यांच्या कडे मतदारांनी पाठ फिरवल्याने सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना या मतदारसंघात विजयासाठी पोषक वातावरण लाभल्याने त्यांचा विजय झाला आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री कपिल पाटील हे कोणात्या इच्छुक उमेदवाराची वर्णी लावणार? तर, या मतदारसंघात महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी,शरद पवार गट)नवनिर्वाचित खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांचे वर्चस्व सिद्ध करतांना जिजाऊ संस्थेचे उमेदवार तापदायक ठरू शकतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.